परवा चार मित्र-मैत्रिणींनी मिळून चाईनीस पदार्थांची “पॉटलक” पार्टी करण्याचा कार्येक्रम केला. त्यात एका मित्रानी, बहुदा ६२ सालच्या लढ्याचा राग व्यक्त करण्यासाठी, चीनी माणसाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाहीत, असे गुजराथी खाकरे आणले होते. मी जरा पाकीट नीट पहिले, कारण माझे एक मन मला सांगत होते, कि साले हे हि “मेड इन चायना” असतील. पण मी जे पाहिले त्यांनी मी आश्चर्यचकित झालो!
कुठल्याही क्षणी “शबरी” हा शब्द माझ्या डोळ्यासमोर आला कि मला डी. डी. वर लागणाऱ्या रामानंद सागरांच्या रामायणातल्या रामाला उष्टी बोरे देणाऱ्या, दात-पडक्या शबरीची आठवण येते. असाच रुचकर भास मला शिरूर तालुक्यातल्या “देसी घी खाकरा” खाताना झाला. पाकीट उघडताना, मनात जरा कुतूहल व अभिमान होता. अभिमान कारण शिरूर, कंसात घोडनदी, येथील खाकरा आज मला रेडमंड मध्ये खायला मिळत होता. आणि कुतूहल कारण मला जाम खात्री होती कि आतून माझ्या हातात अर्धा खाल्लेला खाकरा पडणार!
खाकरे अत्यंत सुरेख होते. आणि का नाही, एवढे “गोमाता का घी” घातलेले अंबोण जरी मला खायला दिले असते, तरी ते त्यावढेच चांगले लागले असते. पण चवी पेक्षा जास्त गम्मत त्या लेबल मध्ये होती. जरा वाचून तर बघा! त्या लेबल वर काय नाही? आता “घोडनदी” हा शब्द वाचून गार झालेलो मी, पुढे वाचू लागलो. लेबलच्या वर “Now Hygenically Packed” बघताच आधीच्या ग्राहकांच्या “hygiene” चे कसे बारा वाजले असतील याचा विचार आला. पण ते जाऊ दे. गाय या शब्दानंतर कंसात गोमाता का लिहावे? म्हणजे काही ठिकाणी गाय हि काय गोपिता असावा का?
आपण स्वतःच “वाह! क्या Taste हे!!!” असे ठरवणाऱ्या या लेबलचे मला खूप कौतुक वाटत होते. हे वाक्य वाचून खात्री पटली कि हे लेबल अस्सल पुणेकरांनी लिहिले असावे. कारण दुसर्याचा अपमान होईल याची खात्री ते करत होते. खाणार्याला जर चव आवडली नाही, तर तो कसा मूर्ख आहे, हे लगेच जाहीर झाले पाहिजे हे त्यातून दर्शत होते. वर “अब जपान में भी…” वाचून तर मला खरोकर आनंद झाला. महाराष्ट्रातील खाकरे जपान मध्ये उपलब्ध आहेत याचा गर्व वाटला. सामुराई तलवारीत आमची भवानी चमकल्याचा आनंद तो.
काहीही असो, बेधडक मार्केटिंग चे प्रतीक आहे हे लेबल. मराठी माणसांनी अशीच बेधक वृत्ती बाळगली तर खाक्रेच काय, उद्या लाखो जिन्नस जपान, चीन, रशियासारख्या अनेक देशात उपलब्ध होतील.


Recent Comments